ओळख

खरे तर मी मूळचा मुंबईचाच, तोही गिरगावातला. गिरगावचे सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांचे संस्कार जपत आणि जोपासत मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळेच ‘मी गिरगावकर’ म्हणताना मला सार्थ अभिमान वाटतो.

जवळजवळ १०० वर्षांपूर्वी आमचे कुटुंब गिरगावात, बोरभट लेनमधील एका इमारतीत राहायला आले आणि आम्ही गिरगावकर झालो. माझे गाव गिरगाव असे म्हणत असलो तरी माझा जन्म मात्र कारवारला, आईच्या माहेरी झाला. भावंडात मी सर्वात मोठा असल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी सुरुवातीपासूनच माझ्यावर पडली होती.

माझे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मुगभाट प्रायमरी शाळा आणि गिरगाव अप्पर प्रायमरी शाळेत झाले. त्याकाळी प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. पुढच्या शिक्षणासाठी मी आर्यन शाळेत दाखल झालो. शाळेत असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा आणि मनापासून शिकवणारे शिक्षक, यामुळे मला शिक्षणात अधिक गोडी वाटू लागली. त्यावेळचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वत:च्या मुलासारखे वागवत आणि शिकवीत असत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषय समजला पाहीजे, त्याने उच्च विद्याविभूषित व्हायला पाहिजे यासाठी ते निर्व्याज प्रेम देत आणि नि:स्वार्थी भावनेने शिक्षण देत.

आमच्याकडे वडिलोपार्जित इस्टेट नव्हती की स्वत:च्या मालकीचे घरही नव्हते. जे काही थोडेफार पूर्वजांचे होते ते भारत-पाक फाळणीत हातातून गेले. एकटा माणूस कमवणार आणि सात माणसे खाणार अशी आमची स्थिती होती. भावांचे शिक्षण, आणि घर चालविताना वडिलांची होणारी ओढाचाण पाहून मी नोकरी करायचे ठरविले. मँट्रिक मला 67% गुण मिळाले होते. त्या मार्कांवर 16 जूलै 1964 रोजी रिझर्व्ह बँकेत ‘कॉईन आणि नोट एक्झामिनर’ म्हणून नोकरीला लागलो.
नोकरी स्वीकारली तरी मनातील शिकण्याची इच्छा कमी झाली नाही. त्याकाळी नोकरी करून मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन करण्यासाठी अर्धावेळ कॉलेजमधून 6 वर्षांचा कोर्स होता. मी 1964 साली रूपारेल महाविद्यालयात सकाळच्या सत्रात प्रवेश घेतला आणि 6 वर्षांनंतर 1970 साली अर्थशास्त्र विषय घेऊन मी पदवीधर झालो.

माझ्या विचारांच्या जडणघडणीला घरचे वातावरण, शाळा-कॉलेजातील शिक्षक यांचा जितका प्रभाव आहे, तितकाच प्रभाव पुस्तकांचा आणि ग्रथांचाही आहे. शाळेपासूनच मी छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. गिरगावातील उत्सव-सोहळे आणि उपक्रमात सहभागी होत असल्यामुळे माझ्यात सुरूवातीपासूनच समाजकारणाची ओढ निर्माण झाली होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि चळवळीतील सभा, मोर्चे आणि आंदोलने मी जवळून पाहात होतो. गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या सभांना उपस्थित राहून देशाच्या मोठमोठ्या नेत्यापुढाऱ्यांची भाषणे ऐकायचा मला छंद जडला होता. नवशक्ती, मराठा आणि नवाकाळ सारखी दैनिके नियमित वाचत होतो. आचार्य अत्रे, नीळुभाऊ खाडीलकरांचा अग्रलेख वाचल्याशिवाय मला चैन पडत नसे. त्या साऱ्यांचा कळत-नकळत माझ्यावर परिणाम होत होता.

मी जेव्हा रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागलो तेव्हा तेथे दाक्षिणात्य मंडळी बहुसंख्येने होती. त्यांचे प्राबल्य असल्यामुळे ते दादागिरी करीत. महाराष्ट्राच्या राजधानीत अमराठी दाक्षिणात्यांची अरेरावी पाहताना मन संतापून उठे. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायामुळे मी बेचैन होत असे. त्याच काळात शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’ मधून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत होते. ‘वाचा आणि शांत बसा’ या मथळ्याखाली वेगवेगळया आस्थापनातील नोकरभरतीमधील दाक्षिणात्यांच्या दादागिरीबद्दल लिहिले जायचे. त्याबरोबर तिथे नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादीही प्रसिद्ध केली जायची. त्या यादीतील दाक्षिणात्यांची प्राबल्य आणि अधिकारी पदावरील त्यांचे आक्रमण पाहून मन पेटून उठे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मराठीजनांनी एकत्र यावे, या बाळासाहेबांच्या आवाहानाला प्रतिसाद द्यावा असे वाटू लागले. त्यावेळी दादर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पर्लसेंटरमध्ये शिवसेनेचे मुख्य कार्यालय होते. तिथे माझे येणे-जाणे सुरु झाले. शिवसेनेसाठी सर्वस्व झोकून देण्याची मनाची तयारी झाली. शिवतीर्थवर माननीय बाळासाहेबांच्या मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत जाताना पराकोटीचा आनंद मिळायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन मी शिवसेनेत कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि स्थापनेपासून म्हणजेच १९६६ पासून मी शिवसैनिक झालो आणि त्याच प्रेरणेने रिझर्व्ह बँकेमध्ये भूमिपुत्रांना नोकरी मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला.

मराठीजनांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन, मराठी तरूणांचे स्फुल्लिंग पेटवून, मराठी जनतेच्या हितार्थ शिवसेना संघटना बांधणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला सापत्न वागणूक देणाऱ्या दिल्लीश्वरांना आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मराठी बाणा दाखविणारे चिंतामणराव देशमुख, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळालाच पाहीजे’ अशी घोषणा करून त्यासाठी महाराष्ट्रात प्रचंड रणकंदन माजवून जनजागृती करणारे प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद केशव अत्रे, एस.एम.जोशी, श्रीपाद अमृत डांगे, भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते, उद्धारकर्ते व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयसक्त कार्याचे मला विलक्षण आकर्षण वाटत होते. भारतीय सैन्यदलाचे प्रमुख व साऱ्या जगामध्ये नावजलेले फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे आदर्शस्थान, फ्रान्समधील मार्सेलिस बंदराच्या किनाऱ्यावर ब्रिटीश सैनिकांची नजर चुकवून बोटीतून उडी मारण्याचे धारिष्ठ ज्यांनी दाखविले ते क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास शब्दबध्द करून आपल्या कणखर आवाजामध्ये अवघ्या महाराष्ट्राला ऐकविला, ‘जाणता राजा’ या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेला दर्शन घडविले आणि कायमस्वरूपी शिवशाही निर्माण करण्याचा ज्यांनी उतारवयात ध्यास घेतला, तसेच प्रत्येक्ष गडावर जाऊन महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे ज्यांनी संशोधन केले ते शिवभक्त ब.मो. तथा बाबासाहेब पुरंदरे, शिवसैनिकांची आस्थेने विचारपूस करणाऱ्या व शिवसैनिक ज्यांना प्रेमाने माँसाहेब म्हणायचे अशा आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी, वात्सल्यमूर्ती कै. मीनाताई ठाकरे या व्यक्ती माझ्या मनाला भावल्या. माझ्या हृद्यात त्यांच्याबद्दल अनन्यसाधारण आदर आहे.

माणूस ज्या भागात जगतो, ज्या वातावरणात वाढतो, त्यातून तो घडतो. आयुष्याच्या सुरुवातीचा जास्त तो काळ मी गिरगावात काढला. माझी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडण गिरगावातच झाली हे मी अभिमानाने सांगत असतो.

तरूणपणीच शिवसेनेच्या म्हणजेच आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांनी मी भारावून गेलो, आणि स्थानिकांच्या, भूमिपुत्राच्या हक्कासाठी लढण्यास सज्ज झालो.रिझर्व्ह बँकेत मराठी माणसांना नोकरीत प्राधान्य मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला. हे काम चालू असतानाच १३ डिसेंबर १९७० ला माझा विवाह झाला. मी गोरेगावात जागा घेतली आणि माझ्या कुटुंबासह गोरेगावाच्या जागेत राहायला आलो. अनेक वर्षे गिरगावात घालविलेला मी १९७१ पासून गोरेगावकर झालो आणि तितक्याच जोमाने मी गोरेगावात लोकसेवेच्या कामांना सुरुवात केली.