कबड्डी, शरीरसौष्ठव आणि खो-खो खेळाडूंना सरकारी नोकऱ्या आणि वाढीव निधीची खा. गजानन कीर्तिकर यांची मागणी.
क्रीडापटूंच्या विविध मागण्यासाठी केंद्रीय मंत्री किरण रीजीजू यांची घेतली भेट.
कबड्डी, शरीरसौष्ठव आणि खो-खो सारख्या भारतीय खेळांना विशेष श्रेणी खेळांमध्ये स्थान मिळावे. सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये खेळाडूंना नोकरी मिळण्याची सक्ती करावी आणि व्यायामशाळांना जी.एस.टी.च्या कक्षेतून वगळावे अशा विविध मागण्या घेऊन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरण रीजीजू यांची भेट घेतली. आपल्या मागण्या पत्राद्वारे नमूद करताना त्यांनी भारतीय खेळ व खेळाडूंच्या वाट्याला येणारी उपेक्षा आणि सरकारी नियमांमुळे खेळाडूंची व्याथा श्री. रीजीजू यांच्या समोर मांडली. यावेळी श्री. कीर्तिकर यांनी देशात खेळल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांचे वर्गीकरण आणि त्याचे भारतीय खेळांवर होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष वेधले. कबड्डी, शरीरसौष्ठव आणि खो-खो सारख्या खेळांना विशेष श्रेणीत स्थान दिल्यास या खेळांचा दर्जा उंचावण्याेस अधिक निधी उपलब्ध करून देता येईल ही बाब श्री. रीजीजू यांच्या निदर्शनास आणून दिली. शरीरसौष्ठव आणि वेट लिफ्टिंग सारख्या क्रीडा प्रकारात खेळाडूंना व्यायामशाळा/जिम मध्ये जावे लागते. सरकारच्या नव्याने जाहीर झालेल्या जी.एस.टी. धोरणात जिम चालकांना समाविष्ट केले आहे. त्याविषयी आग्रही मागणी करत श्री. कीर्तिकर यांनी कबड्डी, शरीरसौष्ठव आणि खो-खो या क्रीडा प्रकारांना जी.एस.टी. च्या कक्षेतून वगळावे अशी मागणी केली.
स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून कामगार चळवळीचा विशेष अनुभव असलेल्या कीर्तिकरांनी आपल्या पत्रात शासकीय व निमशासकीय आस्थापनात खेळाडूंना नोकऱ्या देण्याविषयी आग्रही मागणी केली आहे. या आस्थापनांत कबड्डी सारख्या खेळांचे संघ सक्तीचे केलेले असतानाही अनेक ठिकाणी आजमितीस देखील संघ गठीत केले जात नाहीत. अशा सर्व आस्थापनात संघ गठीत करणे व खेळाडूंची नोकर भरती करणे याविषयीच्या नव्याने सूचना दिल्यास नोकरभरती मधील खेळाडूंचा टक्का वाढेल आणि खेळाडूंचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल त्याचप्रमाणे शासकीय व खाजगी कंपन्यांमधून मिळणाऱ्या सी.एस.आर. फंड मिळविण्यासाठी देखील क्रीडा संघटनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा आवश्यक बाबींची पूर्तता करूनही कंपन्यांमार्फत फंड उपलब्ध करून दिला जात नाही. अशा सर्व कंपन्यांना केंद्र शासनाकडून निर्देश दिले गेल्यास या तीनही क्रीडा प्रकारांसाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकेल असे असे नमूद केले.
खा. कीर्तिकर यांनी केलेल्या मागण्यांवर श्री. रीजीजू यांनी सकारात्मक उत्तर देताना देशभरातील कबड्डी, शरीरसौष्ठव आणि खो-खो या खेळाच्या शिखर संघटनांची बैठक आपण आयोजित करावी असे सांगत आपण सादर केलेल्या प्रस्तावावर योग्य ते निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले. नुकत्याच झालेल्या कबड्डी दिनाच्या अध्यक्षीय भाषणात खा. कीर्तिकर यांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा कार्याध्यक्ष व खासदार या नात्याने कबड्डी आणि इतर भारतीय खेळांच्या उद्धारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. केंद्रीय मंत्री रुजीजू यांची भेट हि त्याचीच सुरुवात आहे असे खा. कीर्तिकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.