आज पश्चिम रेल्वे विभागीय कमिटी खासदारांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील समस्यांबाबतचे निवेदन यापूर्वी सादर केले होते त्यामधील काही समस्यांवर पश्चिम रेल्वेने उपाययोजना केल्या होत्या तर अजूनही काही समस्यांवर काम होणे बाकी आहे, त्या खालीलप्रमाणेः
१. सामंतवाडी रेल्वे स्टाफ कॉलनी, गोरेगाव (पूर्व) येथे रेल्वेच्या हद्दीतील नाल्यामध्ये स्कायवॉकच्या फाऊंडेशनचे पीलर्स उभे केले आहेत ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आपण दिशाभूल करणारे उत्तर दिले आहे. या नाल्यामध्ये ३ ठिकाणी पीलर्स उभे केले आहेत ही वस्तुस्थिती आहे. सदर ठिकाणी तात्काळ नाल्याचे रूंदीकरण करण्यात यावे.
२. गोरेगाव व राममंदिर रेल्वे स्थानकाच्या मध्ये असलेल्या इंदिरानगर या वसाहतीती सन २००९–१० साली स्पार्क या संस्थेमार्फत सर्व्हे करण्यात आला. त्यात नावे नमूद असताना देखील ६ पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन केलेले नाही. याबाबतचा स्पार्कचा सर्व्हे मी आपणाकडे सादर केलेला असताना देखील सर्व्हे मध्ये नावे समाविष्ट नसल्याबाबत आपण कळवले आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे. स्पार्कच्या सर्व्हेनुसार पुर्नपडताळणी करून सदर ६ प्रकल्पबाधीत पात्र झोपडपट्टीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे.
३. जय अंबे वेल्फेअर सोसायटी, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम रेल्वेच्या ६व्या लोहमार्गाचे विस्तारीकरण होत असल्यामुळे अंदाजे ४० पात्र झोपडपट्टीधारक बाधीत होत आहेत. सदर प्रकल्प एम.आर.व्ही.सी. राबवीत असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन एम.आर.व्ही.सी. यांचेकडून करण्यात येईल असे आपण मला कळवले आहे. वास्तविक ६ वा लोहमार्ग पश्चिम रेल्वे साठीच विस्तारीकरण करण्यात येत असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करणे ही पश्चिम रेल्वे प्रशासनाची देखील नैतिक जबाबदारी आहे. आपणही एम.आर.व्ही.सी. कडे या पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा करावा.
४. आंबोली रेल्वे ओव्हरब्रीज (जोगेश्वरी व अंधेरी रेल्वे स्थानकाच्या मधोमध) विकसीत करताना अंदाजे २४० पात्र झोपडपट्टीधारकांचे प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसन केले. परंतु Annexure-2 मध्ये ४० पात्र झोपडपट्टी धारकांचे नाव समाविष्ट असताना देखील त्यांचे अद्याप पुनर्वसन केलेले नाही. त्यांचे तातडीने कायमस्वरूपी पुनर्वसन करून रिक्त होणारा भूखंड रेल्वेच्या विविध विभागांसाठी वापरात आणावा.
५. गोरेगाव (पूर्व) रेल्वे स्थानकाच्या बाहेर हायमास्ट हाईट बसविणेबाबत मी ३ वर्षे सातत्याने मागणी करीत आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. परिणामी येथील प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता मोबाईल चोरी, चेन स्नॅचींग, पीक पॉकेटींग असे प्रकार वारंवार घडत आहेत. याठिकाणी तात्काळ हायमास्ट बसविण्यात यावेत.
६. गोरेगाव ते बोरीवली हार्बरलाईन विस्तारीकरण एम.आर.व्ही.सी. जरी करीत असले तरी सदर जागा व प्रकल्प पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे याबाबत तातडीने मला अहवाल अवगत करावा.
मुद्दा क्र. ७.६ : गोरेगाव रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्र.४,५,६,७ येथे लिफ्ट बसविण्याबाबत गेली २ वर्षे तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आपणाकडू उत्तर मिळत आहे. परंतु कार्यवाहीस दिरंगाई होत आहे. प्रवाश्यांची निकड लक्षात घेता या चारही प्लॅटफॉर्मवर तात्काळ लिफ्ट बसविण्यात यावी.
७. राम मंदिर रेल्वे स्टेशन ते जयकोच, शर्मा इस्टेट हा रस्ता बांधून पूर्ण झाल्याचा आपण अभिप्राय दिला आहे. सदर अभिप्राय दिशाभूल करणारा आहे. आजमितीसही मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाहनांना व नागरीकांना अडथळा निर्माण होत आहे. तात्काळ सदर रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी.