मुंबई उपनगर जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची ऑनलाईन बैठक आज खासदार श्री. गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, या बैठकीमध्ये रस्ता सुरक्षेच्या संबंधी श्री. कीर्तिकर यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. वाहतुक पोलीसांना मदत व्हावी म्हणून पूर्वी वॉर्डनची नेमणूक करण्यात येत होती, परंतु सदर पध्दत बंद करण्यात आल्यामुळे वाहतुक पोलीसांवर ताण पडत असून सदर वॉर्डनची तात्काळ पूर्ववत नेमणूक करण्यात यावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयात व वाहतुक पोलीस ठाणेमध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहन तपासणी व त्यावरील कारवाई करण्याचे काम नीट होत नाही, याकरिता मनुष्यबळ वाढवण्यात यावे. वाहतुक नियमांची पायमल्ली करणा-या वाहनांवर वाहन जप्तीची कारवाई केल्यानंतर सदर वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. रस्ते सुरक्षेसाठी कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचा-यांना रस्ते सुरक्षा विषयक साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विमा कंपन्यानी त्यांच्या सी.एस.आर. फंडातून स्वीकारावी. मद्यपान करून वाहने चालवणा-या वाहकांविरूध्द परिणामकारक कारवाई करणे. अवजड वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाची माल वाहतुक करणा-या वाहनांवर परिणामकारक कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. मुंबई शहारामध्ये दोन जिल्हे असून जिल्हा रस्ता सुरक्षा समिती वेगवेगळ्या आहेत, परंतु रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने व समन्वय ठेवण्यासाठी एकच रस्ता सुरक्षा समिती असावी अशी मागणी केली. मुंबई शहारातील मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर डेब्रीज व बांधकामाची यंत्रसामुग्री तातडीने हटवण्यात येत नाही, परिणामी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते, सदर बाब लक्षात घेऊन तातडीने रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.
सदर बैठकीस खासदार गोपाळ शेट्टी, आमदार रमेश कोरगांवकर, आमदार सुनील राणे, आमदार अतुल भातखळकर, आमदार श्री.दिलीप लांडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, तसेच आटीओ अधिकारी श्री.सुनिल घोसाळकर, श्री.अशोक पवार, श्रीमती पल्लवी कोठावदी, श्री.विनय अहिरे, श्री.संदेश चव्हाण तसेच एमएमआरडीएचे श्री.मुर्तीजय देवरू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. रंजीत हांडे आदी उपस्थित होते.