मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील शिवसेना-भाजपा-रिपाइं(ए)-रासप महायुतीचे उमेदवार खा.गजानन कीर्तिकर यांना पुन्हा लोकसभेवर भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार अंधेरीच्या पंपहाऊस, शेर-ए-पंजाब कॉलनी येथे संपन्न झालेल्या महायुतीच्या गटप्रमुख-बुथप्रमुख व प्रमुख कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्यात करण्यात आला.
शिवसेना-भाजपा यांची गेल्या २५ वर्षांची युती आहे. मधल्या काही काळात मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नव्हते. आप-आपसातील कटुता विसरून शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून कीर्तिकर यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
या महायुतीच्या भव्य महामेळाव्यात राज्याचे राज्यमंत्री रविंद्र वायकर, राज्यमंत्री सौ.विद्या ठाकूर, शिवसेना आमदार व विभागप्रमुख अनिल परब, आमदार सुनिल प्रभु, आमदार रमेश लटके, आमदार अमित साटम आणि आमदार भारती लव्हेकर सह रिपाइं(ए)-गटाचे नेते प्रकाश जाधव उपस्थित होते. शिवसेना-भाजपा पुरूष-महिला संघटक, नगरसेवक आदी मुख्य पदाधिका-यांसह गटप्रमुख-बुथप्रमुख यांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान, शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार खा.गजानन कीर्तिकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे अंबिका टॉवर, पंपहाऊस, अंधेरी (पूर्व) येथे महायुतीचे नेते, आमदार, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित उद्घाटन संपन्न झाले.