शिवसेनेचे माजी उप विभागप्रमुख स्व. भास्कर सुर्वे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन !
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत असताना स्थानीय लोकाधिकार चळवळीत भास्कर सुर्वे यांचा सहभाग होता. मी प्रथम १९९० साली मालाड विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळेस भास्कर सुर्वे उप विभागप्रमुख होते. सन १९९०, १९९५, १९९९ व २००४ सलग ४ वेळा माझ्या निवडणुकीत भास्कर सुर्वे मुख्य निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुख होते. शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेवर भास्कर सुर्वेंचे निस्सीम प्रेम होते, त्यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये आदरयुक्त भिती होती. ते मितभाषी परंतु उत्कृष्ट प्रशासक व शिस्तप्रिय होते. निवडणूक यंत्रणा तसेच शिवसेना पक्षाची बांधणी यामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते.
संपूर्ण मतदार याद्यांबद्दल शाखानिहाय वर्गवारी त्यांना मुखोद्गत होती. शाखाप्रमुख ते गटप्रमुख यांचेमार्फत प्रत्येक मतदार यादीचे भाषानिहाय-ज्ञातीनिहाय वर्गवारी करून माहिती संकलीत करायचे परिणामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना त्याचा लाभ व्हायचा. मार्मिक साप्ताहीकाच्या स्थापनेपासून आजमितीपर्यंतच्या प्रत्येक अंकाचा त्यांनी संग्रह केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भास्कर सुर्वे यांच्या पश्चात ३ विवाहीत मुली, २ विवाहीत मुलगे, सुना, जावई, नातवंडे व धाकटे बंधू-उत्तर मुंबई विभाग क्र. २ चे विभागप्रमुख श्री. सुधाकर सुर्वे असा मोठा परिवार आहे.
स्वर्गीय भास्कर सुर्वे यांना भावपूर्ण आदरांजली !