आज राजीवच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत वाईट वाटले. संसदेतला माझा तरुण सहकारी आज कोरोनामुळे दगावला. अतिशय मृदू स्वभावाचा, नेहमी हसतमुख चेहऱ्याने सर्वांना अभिवादन करणारा राजीव १६ व्या लोकसभेत हिंगोली लोकसभेचे प्रतिनिधित्व करत असताना माझा त्याच्याशी जवळून परिचय झाला. जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा राजीव समोरच्याकडून नवीन काहीतरी जाणून किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करी. २०१४ पासून माझी आणि राजीवची अनेकदा भेट झाली. प्रत्येक भेटीत राजीवने वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आणि त्यावर माझे मत समजून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या चर्चेत वय, पक्ष, विचारधारा याचा कधीही अडसर आला नाही, किंबहुना राजीवने तो येऊ दिला नाही. संसदेत देखील राजीव अतिशय मुद्देसूद बोलत असे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्याने पूर्वी सांभाळले होते. निवडणुकीच्या राजकारणात विधानसभा आमदार आणि २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या अटीतटीच्या लढतीत राजीवने विजय मिळवला होता. राजीवची संघटना बांधणी आणि निवडणुका हाताळण्याचे कसब पाहून काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याच्यावर गुजरात प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती. त्याला त्याने योग्य न्याय देखील दिला.
कोणतेही पद किंवा उमेदवारी यासाठी राजीवने पक्षाला किंवा पक्षातील कोणत्याही वरीष्ठला कधीही धारेवर धरले नाही. १७ व्या लोकसभेत याचाच प्रत्यय देत विद्यमान लोकसभा खासदार असूनही राजीवने अतिशय नम्रपणे लोकसभेची उमेदवारी नाकारत, संघटनेची जबाबदारी स्वीकारून पक्षाचे काम केले.
राजीवच्या संघटना बांधणीमधील कसब पाहून काँग्रेसने तरुण चेहरा संसदेत असावा म्हणून राजीवची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. संकटकाळी काँग्रेस किंवा गांधी कुटुंबियांकडे अनेक काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली, राजीव मात्र आपल्या नेत्याच्या पाठीशी ठाम उभा राहिला.
काँग्रेसच काय, सर्वपक्षीय नेत्यांमध्ये त्याचे सलोख्याचे संबंध होते. राजीवच्या मातोश्री रजनीताई देखील विधानसभेत २ वेळा आमदार म्हणून निवडून गेल्या होत्या. कुटुंबाला जरी राजकीय पार्श्वभूमी लाभली होती, तरी त्याचे कोणतेही पद घरणेशाहीमुळे त्याला देण्यात आले असे म्हणणे चुकीचे ठरेल.
मोठी पदे आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून देखील राजीवच्या बोलण्या-वागण्याला कधीही अहंकाराचा दर्प नव्हता.
आज राजीवच्या जाण्याने केवळ मराठवाडा किंवा काँग्रेसचेच नाही तर राज्याचे आणि देशातील तरुण पिढीचे मोठे नुकसान झाले आहे. पन्नाशी गाठण्यापूर्वीच राज्य व राष्ट्रीय युवक संघटनेचे अध्यक्षपद, आमदार, व दोन वेळा खासदार अशी मोठी मजल राजीवने मारली होती.
आज राजीव आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्याच्या अकाली जाण्याने मी माझा तरुण सहकारी तर गमावलाच आहे, त्याहीपलीकडे देश एका अजातशत्रू युवा नेत्याला आज मुकला आहे.
राजीवच्या कुटुंबाला यातुन सावरण्याची शक्ती मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.